मॅड, यंग, प्रेमाची झिंग आणणारा ‘कबीर सिंग’

– सानिया भालेराव

‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट मला खूप आवडला होता आणि म्हणून ‘कबीर सिंग’ या चित्रपटाची उत्सुकता होतीच. हा चित्रपट फ्रेम टू फ्रेम अर्जुन रेड्डीशी साधर्म्य साधणारा आहे हे माहित होतंच पण अतिशय कॅड विजय देवरकोंडाने जो अर्जुन रेड्डी साकारला आहे त्यात शाहिदचा कबीर सिंग कितपत न्याय देणार हे पाहायचं होतं आणि इंग्लिश सबटायटल्स मध्ये वाचून चित्रपट पाहणे आणि तो हिंदीत ऐकणे यातला फरक खूप असल्याने कबीर सिंग बघणं मस्टच होतं. शाहिद फिजिकली फारसा अर्जुन रेड्डी स्टाईल नसला तरीही त्याने जे ऍटिट्यूड पकडलं आहे ते खास आणि केवळ जबरदस्त एक्टिंगच्या जोरावर डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी नसताना देखील फार कन्विन्सिंगली तो कबीर सिंगला कॅरी करतो. शाहिद लिटरली रॉक्स..( विथ बर्फ वगैरे)

आता कबीर सिंग कसा संस्कृती/एथिक्स चा ह्रास करणारा आणि स्त्री द्वेष/ पुरुषी वर्चस्व, बॅड बॉईज वगैरे यांचं ग्लोरिफिकेशन करणारा चित्रपट आहे वगैरे वगैरे हा सध्या वादाचा विषय झाला आहे. चित्रपटाची गोष्ट थोडक्यात सांगायची झाल्यास एका मेल शोव्हनिस्टिक हुशार डॉक्टरची ही प्रेमकहाणी. मॅड, लार्जर दॅन लाईफ, गरम डोक्याच्या, आपल्या कामात बेस्ट असणारा सर्जन जो प्रेमात असफल राहून प्रेयसी न मिळाल्याने दारू, नशा करून सगळे ऑपरेशन्स चोख करतो.. त्याच्या या प्रवासाची ही गोष्ट. अत्यंत क्लिशेड, फुल मेलोड्रामा, एक्सस्ट्रीम जेंडर अनबायस.. या सगळ्या गोष्टी खच्चून भरल्या आहेत आणि ज्यांना चित्रपटांना मॉरल फूटपट्ट्या लावून जोखत बसायला आवडतं त्यांच्यासाठी हा चित्रपट नाही. अर्जुन रेड्डी म्हणा, कबीर सिंग म्हणा ही एक वेड्या माणसाची वेडी प्रेम कहाणी आहे. पॅशनेट, एललॉजिकल, इरॅशनल लव्ह स्टोरी!

या चित्रपटाच्या निमित्ताने जी चर्चा झाली, पाहताना जे ऑब्झर्व्ह केलं त्यावर लिहावसं वाटलं आणि म्हणून ही पोस्ट . माझ्या मैत्रिणींबरोबर हा चित्रपट पाहायला गेले होते. चकचकीत मल्टिप्लेक्समध्ये सहसा शिट्ट्या, कमेंट्स ही रेअरिटी आहे आजकाल. पण हा चित्रपट एक्सेप्शन होता. पुरुष वर्ग भलताच चेकाळलेला होता आणि काही मिनिटांसाठी का होईना, अंधारात चालू चित्रपटात थोड्या बोल्ड कॉमेंट्स करून आपण सुद्धा अर्जुन रेड्डी कम कबीर सिंग होऊ शकतो असं वाटून ऍड्रिनॅलीन रशच्या नावावर शिट्ट्या, कमेंट्स चालू होत्या. माझ्या काही मैत्रिणी नक्कीच अस्वस्थ झाल्या. विशेषतः जेंव्हा कबीर सिंग प्रीतीच्या थोबाडीत मारतो.. तेंव्हा पब्लिक क्या बात है. मेरे शेर, टाळ्या, शिट्ट्या.. हे असलं करते.. यावर माझी एक फॅमिली कोर्टात काम करणारी वकील मैत्रीण खूप चिडली होती. हा चित्रपट कसा मिसोजेनिस्ट आहे हे ती इंटरव्हल मध्ये तावातावाने सांगत होती. मी माझ्या चिकन सँडविचची वाट पाहत होते. मी तिला म्हणाले की प्रीती सुद्धा कबीर ला थोबाडीत मारते.. पण तेंव्हा एकाही पुरुषाने वाजवली का टाळी? हा प्रतिप्रश्न तिने केला..

त्यानंतर कबीरचा पुरुषी इगो, टोकाचं वागणं, होरोइझम आणि त्याला पडणाऱ्या प्रेक्षकांच्या टाळ्या.. हे चालूच राहीलं.. मला शिट्टी वाजवता येत नसली तरी एक दोन टाळ्या.. जमेल तसे आवाज काढून, मैत्रिणींच्या नापसंतीच्या तीव्र नजरांकडे दुर्लक्ष्य करून मी पण जे काही ऍड्रेनलीन माझ्या शरीरात चुकून माकून बनत असेल.. त्याला मनसोक्त वाहायला वाट मोकळी करून दिली. चित्रपटाच्या शेवटी एक सिन आहे जो क्लायमॅक्स असल्याने इथे सांगता येणार नाही पण कबीर मित्राला सांगतो की प्रीती आता ती कॉलेजमधली मुलगी राहिली नाही.. यावर ‘वो अब आंटी हो गयी ‘हैं असं एक महापुरुष म्हणाला आणि मग इतर महापुरुष गडगडाटी हसले. इथे मात्र मला थोडं अस्वथ वाटलं. कबीर इथे इमोशनल असतो आणि त्याला असं म्हणायचं असतं की काहीही झालं तरीही माझं प्रीतीवरचं प्रेम कमी होणारं नाही. लग्न, त्यानंतर होणाऱ्या गोष्टी यात माझं प्रेम हरवून जाणारं नाहीये. आणि अशा कित्येक सेन्सिबल गोष्टी तो बोलतो पण आपल्याकडे प्रेक्षकांना जे पर्सिव्ह करायचं असतं तेच ते पर्सिव्ह करतात. स्त्रीवर तिच्या शरीरापलीकडे जाऊन प्रेम करणारा कबीर सिंग या पुरुषांना बघायचा नाहीये.. शिव्या देणारा, मुलीच्या थोबाडीत मारणारा, नशा करणारा, डॉमिनेटिंग असाच कबीर सिंग पुरुषांना बघायचा आहे आणि त्याचं हे वागणं कुल आहे याचं समर्थन वा अनुकरण करायचं आहे आणि स्त्रियांना सुद्धा याच गोष्टी कशा फेमिनिझमच्या विरोधात आहेत आणि हे असं दाखवून समाजात आपण काय शिकवण देत आहोत असा टिपिकल फॉल्स फेमिनिझमचा चष्मा घालून बघायचं आहे.

चित्रपट संपल्यावर एकूणच माझ्या मैत्रिणींना कबीर सिंगचं बायकांना फक्त उपभोगाची वस्तू म्हणून पाहणं, चाकू दाखवून एखाद्या स्त्रीवर बळजबरी करू पाहणं, प्रीतीला काहीही अक्कल नाही असं समजून तिला ट्रीट करणं, एव्हढं एम बी बी एस करणारी प्रीती इतकं कणाहीन कशी असू शकते, दारू वगैरे पिऊन, अफेअर्स करून शेवटी सगळं नीट होतं हे दाखवू पाहणारा हा चित्रपट म्हणजे पुरुषी वर्चस्व असणाऱ्या समाजाचं एक प्रातिनिधिक स्वरूप आहे वगैरे वगैरे.. अशा खूप गोष्टी खटकल्या होत्या. मी चित्रपट एन्जॉय केला आणि मी ९५ टक्के मिसोजिनिस्ट समाजाचा एक भाग वगैरे बनले आहे असं यांना वाटायला लागलं. मला जाम आश्चर्य वाटलं. एकतर कबीर सिंग हे पात्र आहे आणि हा चित्रपट आहे आणि अर्जुन रेड्डी/कबीर सिंग ही एक फिलॉसॉफी आहे हे एकदा एक्सेप्ट केलं की हे का, ते का, हे असं जोखत बसणं मला निरर्थक वाटतं. सगळीकडे फेमिनिझमचे झेंडे फडकवायचे हे देखील मला मजेशीर वाटतं. मी स्त्री आहे का पुरुष हे विसरून मला साधा चित्रपट एन्जॉय करता येऊ नये? “विजय देवरकोंडा जाम हँडसम दिसला होता या सिन मध्ये.. शाहिद मैं वो बात नहीं”.. जेंव्हा एका सीन मध्ये शाहिद शर्ट काढतो तेंव्हा मी म्हणाले.. तर शु… हळूहळू.. काहीही काय बोलते वगैरे.. असं म्हणणाऱ्या माझ्या मैत्रिणी किंवा माझ्या पुढे बसलेले ती बॉलिवूड ऐक्ट्रेस जिया खान आल्यावर शिट्ट्या मारणारे सो कॉल्ड कुल ड्युडस.. मी असं बोलल्यावर एकदम मागे वळून पाहतात..हे फार दुर्दैवी वाटतं. कॉन्ट्रडीक्टरी वाटतं आणि ते असणारचं कारण हे असंच असतं.

मी हा चित्रपट एन्जॉय केला आणि मला आवडला कारण मी तो एक चित्रपट म्हणून पाहीला. यातली गाणी जाम कातिल आहेत जी मूळ अर्जुन रेड्डीमध्ये मिसिंग होती. प्रत्येक चित्रपट सामाजिक भाष्य करणारा नसतो. त्यातून काही उपदेश मिळावा/ समाजात परिवर्तन घडावं असं मी मानत नाही. मला यात काय दिसलं तर अर्जुन रेड्डीच मॅडछाप प्रेम. प्रेम आयुष्यात नसलं तर काय होऊ शकतं.. हे ज्या भीषण पद्धतीने यात दाखवलं आहे, त्या सेन्टोमेंट्स माझ्या पर्यंत पोहोचल्या. एकाकीपण, स्वतःचा घात करू पाहणारं प्रेम, एका व्यसनाप्रमाणे आयुष्य व्यापून टाकणारं प्रेम.. आणि ही त्याची गोष्ट. यात कबीरच्या आजीचा एक छान डायलॉग आहे.. ती म्हणते ‘मी कबीरला काय समजावू? Its his suffering.. let him suffer.’.

तमाम फेमिनाझी, मिसोजिनिस्टिक, संस्कृती रक्षक, स्त्री- पुरुष समानता, असमानता, चूक- बरोबर, मॉरल्स, एथिक्स अशा चौकटींपलीकडे काहीतरी मॅड, यंग, प्रेमाची झिंग आणणारं पाहायचं असेल आणि सोसणारं असेल तर हा चित्रपट पाहा. हे जमणारं नसेल आणि आपल्या फुटपट्ट्यांवर जोखत बसायचं असेल तर तेही खुशाल करा.. आज संध्याकाळी निवांत वेळ असेल, तर संध्याकाळचं सुसाट वारं अनुभवतांना “बेखयाली में भी तेरा ही ख्याल आये… क्यूँ बिछड़ना है ज़रूरी ये सवाल आये” हे गाणं ऐकून बघाच… इरशाद कामिलने या गाण्यात शब्दांची कमाल दाखवली आहे. ते आवडल्यास ‘तुझे कितना चाहने लगें हम’.. हे सुद्धा ऐका.. आवडेल.. आवडणार नाहीही.. पण काहीतरी आठवेल हे मात्र नक्की.. काहीतरी जे पकडता येणार नाही.. जे आहे पण दिसणार नाही… “तेरे साथ हो जायेंगे ख़तम तुझे कितना चाहने लगे हम” असं म्हणणाऱ्या कबीरच्या प्रेमासाठी.. आणि त्यानिमित्ताने माझ्यात अजूनही क्रेझी स्टेक्स आहेत याची आठवण करून देणाऱ्या कबीर सिंग aka अर्जुन रेड्डीला Neat yet Non – Alcoholic Cheers! Cheers to crazy, mad love!

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे )

[email protected]

Previous articleआंद्रे आगासीच्या बाबाची कहाणी
Next articleअमृता -इमरोजची लव्ह स्टोरी- सच्च्या प्रेमाची अद्भुत गाथा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.