भारतीय स्त्रियांनो, सर्व पुरुष देवांचा, देवळांचा बहिष्कार करा

-मुग्धा कर्णिक

सबरीमाला…
कदाचित् त्या शबरीचा निवास असलेल्या पर्वतरांगा. या प्रेमळ आदिवासी स्त्रीच्या आठवणी तर कधीच पुसल्या गेल्या. आणि शबरीमलय हे एका झोंड देवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध झाले. मद्दड भक्तीच्या पायावर धर्माचे व्यापारी कळस चढवणाऱ्या देशात सारीच तीर्थस्थाने बकाल, बकवास झाली आहेत. या ठिकाणी त्या बकालतेला स्त्रियांना प्रवेश नाकारण्याचे लांच्छनही चिकटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवाडा केला. प्रवेश दिलाच पाहिजे हे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील निर्णयाचा आदर करणे ही प्राधान्याने सरकारची जबाबदारी. पण केंद्रात ज्या झोंडांचे राज्य आहे त्यांचाच पक्ष आणि मातृसंघटनेची आंधळी पिलावळ या निकालाचा अवमान करते आहे. केरळची सत्ता ताब्यात येण्यासाठी जी काही दुही माजवायची आहे त्याच नक्षीकामाचा भाग आता शबरीमलयमधल्या स्त्रियांच्या प्रवेशाचा प्रश्नही झाला आहे.
महिला पत्रकारांच्या गाड्या अडवणे, त्यांच्यावर हल्ले करणे हेही या भुतावळीने केले.
तिथे जाऊ पाहाणाऱ्या स्त्रियांना हिंसक पद्धतीने अडवून हाकलून दिले. ज्यांचे स्वप्नच या देशातील लोकशाहीचा संपूर्ण पोतच बदलण्याचे आहे, त्यांना सर्वोच्च न्यायालयाची काय पत्रास वाटणार.
गलिच्छ राजकारण करणारी एक अंतर्बाह्य गलिच्छ टोळी आहे ही.
यात काहीच नवीन नाही.

पण आता पुढे…
एक प्रतिकात्मक विधान म्हणून सर्व देवळांत स्त्रियांना प्रवेश मिळाला पाहिजे वगैरे ठीक आहे. पण आता त्यापुढे आपण कधी जाणार.

मी तर नास्तिकच आहे. लोकांनी सर्वच देवांपुढे- अल्लापुढे, गॉडपुढे शरण जाणे सोडावे असे मी नेहमीच मानणार.

पण हा जो काही हट्टाग्रह आहे की अमुक जातीला, स्त्रीजातीला देवळात प्रवेश मिळाला पाहिजे ही एक भंकस आहे. अखेर प्रतिगामी शक्तींच्या हातातले कोलीत बनणारी भंकस.

हिंदू देवांमधला एकतरी देव असा आहे का की जो स्त्रियांचा आदर करणारा आहे? कुठल्या देवाच्या कथेमध्ये त्याने एकाही स्त्रींबाबत अय़ोग्य वर्तन केले नसल्याचे दिसते? एकही नाही.

ठीक आहे- जेव्हा ही देवमिथके, कथा तयार झाल्या तेव्हाच्या परिस्थितीला अनुरुप अशी ती रचना असेल. आता तरी ती प्रतीके कालबाह्यच नव्हे तर नीतीबाह्यही झाली आहेत.

तृप्ती देसाई किंवा तशा फेमिनिस्ट स्त्रिया जेव्हा मंदिरातील प्रवेश, चौथऱ्यावरील प्रवेश हे मुद्दे लढाईचे बनवतात तेव्हा त्या स्वतःच्या पराभवालाच आमंत्रण देतात हे खेदाने नोंदते आहे.

भारतीय हिंदू स्त्रियांच्या वतीने स्त्रीवादाने खरी घोषणा द्यायची तर ती असायला हवी- सर्व पुरुष देवांचा बहिष्कार, सर्व पुरुष देवांच्या देवळांचा बहिष्कार…

असे झाले तर देवांशी निगडित सगळा व्यापारव्यवहार धोक्यात येईल, गड्यांनो. कळस कोसळतील आणि तुमच्या प्रगतीच्या रस्त्याचे दगड बनतील.
आजमावून पहा.

महिला पत्रकारांवरील हल्ल्याचा video पहा –  https://www.ndtv.com/kerala-news/two-journalists-covering-sabarimala-protests-attacked-car-smashed-1933382

https://timesofindia.indiatimes.com/videos/news/sabarimala-row-journalists-heckled-attacked-by-anti-women-mob-in-nilakkal/videoshow/66260190.cms

 

(लेखिका इंडियन स्टडी सेंटर ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत)

[email protected]

Previous articleजातीसाठी माती खायची ?
Next articleमहात्मा गांधी आणि अर्थशास्त्र – प्रा. श्याम मानव
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.