काँग्रेसला चंद्रपूर जिकांयचेच नाही!

-अजिंक्य पवार
लोकसभा निवडणुकीत गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने  पराभव स्वीकारणा-या चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना अद्यापही शहाणपण सुचत नाहीय मोदी लाटेत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील सहापैकी पाच मतदार संघांत भाजपचे आमदार निवडून आले होते. भद्रावतीचे शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर एकमेव अपवाद. काँग्रेसच्या हाती असा ‘भोपळा’ असतानाही येथील नेत्यांचा अहंकार तसूभरही कमी झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेचा आमदार काँग्रेसमध्ये यायला तयार असताना त्याच्या प्रवेशाला आडकाठी घालण्याचा करंटेपणा काँग्रेसचे नेते दाखवत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना काँग्रेस अद्याप आपला उमेदवार निश्चित करू शकली नाही. दुसरीकडे केंद्रिय गृहराज्यमंत्री अहिरांची उमदेवारी गृहीत धरून भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली आहे.
  हंसराज अहीर यांच्या विजयात मतविभाजनाचा नेहमीच मोठा वाटला राहिला आहे.  २०१४ ची निवडणूक केवळ त्याला अपवाद ठरली. मोदी लाटेत तेव्हा अहीर तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. तेव्हा अहीर यांच्या विरोधात रिंगणात असलेले काँग्रेसचे संजय देवतळे आणि ‘आप’चे अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या मतांची एकत्रित टक्केवारी अहिरांच्या मतांपेक्षा केवळ तीन टक्क्यांनी कमी होती. म्हणजे मोदी लाटेतसुद्धा अडीच लाखांवर काँग्रेसची ‘व्होटबँक’ शाबूत होती. त्यामुळे यात आणखी दोन-अडीच लाखांची भर टाकणारा उमेदवार म्हणून धानोरकर यांच्याकडे बघितले जात आहे. चटपांना मिळालेली मते धानोरकरांकडे समाजाचा माणूस म्हणून येऊ शकतात. शिवसेनेची बरीचशी मते ते काँग्रेसकडे आणू शकतात.
    हे सगळे अनुकूल घटक लक्षात घेवून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच बाळू धानोरकर यांचा काँग्रेस प्रवेश आणि चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांना तयार केले. धानोरकरसुद्धा त्यादृष्टीने तयारीला लागले होते. शिवसेनेत राहून सातत्याने ते भाजपविरोधात भूमिका घेत होते. वीस दिवसांपूर्वी लोकसभा क्षेत्रातील शिवसैनिकांच्या बैठकीत वेग़ळा मार्ग निवडत असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. त्यानंतर त्यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित समजला जात होता. मात्र, धानोरकरांचे नाव लोकसभेचा उमेदवार म्हणून समोर आल्यानंतर पक्षाच्या नावाने आपल्या दुकानदा-या  सांभाळणारे कॉंग्रेसमधील नेते सक्रिय झाले. त्यांनी टीपिकल कॉंग्रेसी पद्धतीचे राजकारण सुरु केले  धानोरकर यांच्या विरोधात तक्रारींचा पाऊस दिल्लीत पाडण्यात आला. अर्थात धानोरकरांच्या समर्थनार्थसुद्धा जिल्ह्यातील काँग्रेसचे काही नेते समोर आलेत.  मात्र, गटातटाच्या राजकारणामुळे वडेट्टीवार यांनाच लोकसभा निवडणूक लढा, असे पक्षश्रेष्ठींनी सांगितले. मात्र वडेट्टीवार तयार नाहीत. त्यामुळे नागपूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल मुत्तेमवार याला चंद्रपुरात उमेदवारी देण्याचा आत्मघाती निर्णय पक्षाने जवळपास घेतलाच होता. मात्र विशाल मुत्तेमवार यांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. दुसरीकडे त्यांचे नाव जाहीर होताच भाजपने विजयाचा जल्लोष सुरू केला. भाजपला काँग्रेसने लोकसभेची जागा ‘दान’ केली, अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली. प्रचंड विरोधानंतर शेवटी मुत्तेमवारांचे नाव मागे पडले. आता पुन्हा गटबाजीला सुरुवात झाली आहे.
      भाजप निवडून येण्याची क्षमता हाच निकष ठेवून उमेदवारी देत असताना काँग्रेस गटातटाच्या राजकारणात अडकली आहे. वडेट्टीवार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष धोटे आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील काँग्रेसच्या एकाही नेत्याकडे जनाधार नाही. बाकी सर्वच गल्लीछाप नेते आहेत. धोटे लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. पुगलिया लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत मात्र त्यांच्या नावाला प्रदेशाध्यक्ष चव्हाण, वडेट्टीवार आणि धोटे यांचा प्रचंड विरोध आहे. याचा फायदा घेत जिल्ह्यातील काँग्रेसचे काही फुटकळ पदाधिकारी काटोलचे आमदार आशिष देशमुख  यांच्या खर्चाने दिल्लीत त्यांच्यासाठी लॉबिंग करायला गेले. तब्बल पंधरा दिवस त्यांनी देशमुखांच्या पैशावर दिल्लीत मौजमजा केली आणि परत आले. अहीर यांच्या विरोधात मतदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. पक्षांतर्गत सर्वेक्षणामध्येही मतदार अहिरांवर नाराज असल्याचे समोर आले आहे . त्यांची नाराजी ‘कॅश’ करण्यासाठी तगडा उमेदवार रिंगणात उतरविण्याऐवजी पक्षाचे वरिष्ठ नेतेही जिल्ह्यातील गटातटांना खतपाणी घालत आहेत. अशा परिस्थितीत  काँग्रेसला  चंद्रपूर लोकसभा जिंकायचीच नाही, असा सूर कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह सर्वत्र व्यक्त  आहे.
(टीम मीडिया वॉच)
Previous articleअधुरी एक कहाणी…!
Next articleगडचिरोलीत ओबीसींची नाराजी भाजपला भोवणार ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.