‘अजात’ही झाली ‘जात’!


– नितीन पखाले
इ.स.१९२० ते ४० च्या दशकात विदर्भातील अमरावतील जिल्ह्यात मंगरूळ दस्तगीर या गावात गणपती महाराज यांनी जात न मानणाऱ्यांचा ‘अजात’ संप्रदाय निर्माण करून जाती व्यवस्थेला मोठा हादरा दिला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अठरा पगड जातीतील लोकांनी आपल्या जातीची कवचकुंडले फेकून दिली आणि ते ‘अजात’ झाले. पण पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात गणपती महाराजांचा समतावादी, सुधारणावादी इतिहास आजतागायत बेदखल राहिला. शोकांतिका म्हणजे गणपती महाराजांच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीला शासनाने चक्क ‘अजात’ या जातीचे लेबल चिकटवले आणि हा संप्रदाय अजात जातीच्या चौकटीत बंदिस्त झाला! या ‘अजात’ संप्रदायाची रंजक कहाणी.
महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्गहीन समाजरचनेसाठी कायम आग्रह धरला. पण या धुरिणींच्या प्रयत्नांनाही खीळ बसून आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात जात आपल्या मानगुटीवर अधिक घट्ट बसली. जातीच्या कुबड्या वापरून समाजजीवनात राजकारणातील यशाची शिडी चढता येते, असा भ्रामक  विश्वास राज्यकर्त्यांना आल्याने ”जात नाही ती ‘जात”, हे कालमार्क्सचे म्हणणे अधिकच वास्तववादी ठरले आहे. मात्र आज समाज जात-धर्मकेंद्री होत असताना शंभर वर्षांपूर्वी विदर्भात एका अध्यात्मिक महाराजाने जातीअंताची लढाई सुरू केली, तीही स्वत:पासून. विदर्भ संतभूमी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्वाने केवळ विदर्भच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाला जाती धर्म विरहित वैचारिक दिशा दिली. या संतांनी अध्यात्मिक विचारांचा आधार घेऊन समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांडांवर प्रखर टीका केली. या माळेतील सुधारक संत म्हणून मंगरूळ दस्तगीर, (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील गणपती महाराजांचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. इंग्रजांच्या जुलमी राजवटीत ज्यावेळी समाज अज्ञान, अंधश्रद्धा, गरीबी यात खितपत पडला होता, त्या काळात गणपती महाराजांनी केलेली जातीअंताची क्रांती त्यांना ‘भारतरत्न’ किताब देऊन गौरविण्यात यावा, या पात्रतेची आहे. 
  इ.स.१९२० ते ४० च्या दशकात गणपती महाराज यांनी समाजातील जात, धर्म, रूढी, परंपरा, कर्मकांडाविरोधात आवाज उठवून समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला कृतीतून उत्तर दिले. जात न मानणाऱ्यांचा ‘अजात’ संप्रदायच त्यांनी निर्माण केला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वच अठरापगड जाती, धर्मातील हजारो कुटुंबांनी आपल्या जातीची कवचकुंडले फेकून दिली आणि ते ‘अजात’ झाले. पण पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात गणपती महाराजांचा समतावादी, सुधारणावादी इतिहास आजतागायत बेदखल राहिला. शोकांतिका म्हणजे गणपती महाराजांच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीला खुद्द शासनाने चक्क ‘अजात’ या जातीचे लेबल चिकटवले आणि हा संप्रदाय अजात जातीच्या चौकटीत बंदिस्त झाला! गणपती महाराजांचे जातीअंताचे कार्य आणि आता त्यांच्या वंशजांच्या जन्म, शाळेच्या दाखल्यावर जातीच्या रकान्यात ‘अजात’ म्हणून लागलेले लेबल अशा विरोधाभासात अजात संप्रदायाची वाटचाल सुरू आहे. या संप्रदायातील नवीन पिढी जात न मानणाऱ्या वंशातील असली तरी अजात म्हणून त्यांच्या वाट्याला आलेल्या विवंचना, आमच्या पूर्वजांनी जात न मानून गुन्हा केला काय, हा प्रश्न उपस्थित करीत आहे. शिक्षणात, नोकरीत कुठे आरक्षण नाही की, कोणत्या शासकीय योजनांचा लाभ नाही! गणपती महाराजांनी १०० वर्षांपूर्व मिश्र विवाहाची संकल्पना रूजवून आपल्या अनुयायांकडून तिची अंमलबजावणी करून घेतली. स्वत: एका विधवेशी आंतरजातीय विवाह केला. मुलाचे लग्न दुसऱ्या जातीतील मुलीशी लावून दिले. पण सध्या त्यांच्या वंशातील मुलींना कोणी सून म्हणून सहज स्वीकारत नाही, तर मुलांना कोणी मुलगी द्यायला बघत नाही! अशा विचित्र द्वंद्वात अडकल्याने हा संप्रदाय नाईलाजाने पुन्हा आपल्या मूळ जातीकडे वळू पाहतोय. त्यामुळे गणपती महाराजांनी १०० वर्षांपूर्वी केलेल्या सुधारणावादी कार्यावरच पाणी फेरले जात आहे. अशाही प्रतिकूल परिस्थितीत हा संप्रदाय गणपती महाराजांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन चालत आहे. मात्र सध्या या संप्रदायासमोर असलेली आव्हाने, शासनाच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालेल्या अडचणी या चक्रात अडकलेल्या नव्या पिढीला यातून बाहेर काढून हा संप्रदाय जिवंत ठेवणे हे आजच्या बदलत्या सांप्रदायिक परिस्थितीत पुरोगामी महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान आहे.  
 ‘अजात’ संप्रदायाचा इतिहास रंजक आहे. वर्धा जिल्ह्यातील काचनूर या गावात १८८७ साली गणपती उर्फ हरी भबुतकर यांचा जन्म झाला. सर्वसामान्य परिस्थितीत वाटचाल करत असताना ते घोराडच्या केजाजी महाराजांच्या सान्निध्यात आले आणि अल्पावधीतच केजाजी महाराजांचे आवडते शिष्यही झाले. केजाजी महाराजच गणपती महाराजांचे पहिले आध्यात्मिक गुरू. इ.स. १९०० ते १९१५ पर्यंत गणपती महाराजांनी हा भक्तीमार्ग अवलंबला. या काळात भजन, कीर्तन, प्रवचन यातून भक्तीचा आणि भक्तीतून मोक्षाचा मार्ग अशी त्यांची अध्यात्मिक मांडणी होती. गणपती महाराजांचे शिक्षण जेमतेम होते. परंतु त्यांचे वाचन प्रगाढ होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे साहित्य वाचून त्या प्रेरणेतून सामाजिक वर्ण, द्वेषाच्या अंध:कारात खितपत समाजाला अध्यात्माच्या मार्गाने परिवर्तनवादी विचारांकडे नेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१५ नंतर आपले आयुष्य वाहून घेतले. मंगरूळ दस्तगीर येथे आल्यानंतर हे गावच त्यांची क्रांतीभूमी आणि कर्मभूमी झाली. 
गावात ब्राह्मण व सवर्ण समाज बहुजन, अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देत नाही, त्यांचा अनन्वित छळ करतात हे त्यांनी पाहिले. अस्पृश्य, बहुजनांना ब्राह्मणांप्रमाणे समान वागणूक मिळावी म्हणून त्यांनी चळवळ सुरू केली. चातुर्वर्णव्यवस्थेला बळ देणाऱ्या ‘मनुस्मृती’ ग्रंथावर त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणतात, 
मनुस्मृतीची धडधड ।
होय ब्राह्मणी पिनलकोड ॥
त्यातील कलमा गोड ।
आहे सुगड रितीच्या ॥
गणपती महाराजांनी सर्वप्रथम आपल्या घरात चुलीपर्यंत गावातील अस्पृश्य, दलितांना प्रवेश दिला. राघवानंद माणिक, केजाजी व केकाजी इंगळे यांना हा सन्मान मिळाला. गावातील मंदिर अस्पृश्यांसाठी मंदिर खुले करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. महाराजांच्या या कृतीने गावातील सवर्ण, ब्राह्मण प्रचंड खवळले. त्यांनी महाराजांना गावातून हुसकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र गणपती महाराजांनी थेट पंढरपुरहून विठ्ठलाची मूर्ती विकत आणली आणि आपल्या शेतात अस्पृश्यांच्या मदतीने मंदिर बांधून तिथे सर्व अस्पृश्य, बहुजन, दलितांच्या उपस्थितीत मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. दि. ११ नोव्हेंबर १९२९ मध्ये हे मंदिर गावातील सर्व लोकांसाठी खुले केले. त्याची व्यवस्थाही गावातील अस्पृश्य, दलितांकडे सोपविली. गणपती महाराज थेट आव्हान देत असल्याने चिडलेल्या ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकून जीवे मारण्याचाही कट रचला. मात्र महाराजांनी हार मानली नाही. तोपर्यंत ब्राह्मणेत्तर अनुयायी महाराजांच्या बाजूने उभे राहिले. विदर्भातील सुधारणावादी विचारांचा हा पहिला लढा. 
जात आणि धर्म हेच समाजातील सर्व समस्यांचं मूळ आहे. तीच नष्ट केली पाहिजे हा विचार महाराजांनी मांडला. ते म्हणतात, 
जातीभेद सारे मोडूनी जावेत।
अभेद व्हावेत सर्व लोक ॥
गण्या म्हणे ऐसे भट याती मत।
नाही ते दिसत मनातूनी ॥
अशा परिवर्तनवादी विचारांच्या साहित्यातून गणपती महाराजांची जातीअंताची लढाई सुरू झाली. सृष्टीत स्त्री आणि पुरूष या दोनच जाती असून मानवता हा एकच धर्म आहे, असे विचार गणपती महाराज आपल्या कीर्तनातून गावोगावी मांडू लागले. मानवधर्माची पताका खांद्यावर घेऊन ‘श्वेत निशाणधारी अजात मानवसंस्था’ त्यांनी स्थापन केली. कृतीतून समाजाला उत्तर देण्यासाठी गणपती महाराजांनी इ.स. १९१७ मध्ये आंतरजातीय विवाह केला तो एका विधवेशी. या निर्णयाला सवर्ण समाजाकडून प्रचंड विरोध झाला. त्यांना बहिष्कृत करण्यात आले. पण ते मागे हटले नाही. त्यांनी आपल्या विचारांची माणसे जोडली आणि जाती अंताची लढाई तीव्र केली. त्यासाठी महाराजांनी मिश्र विवाहाला प्रोत्साहन दिले. मिश्र विवाह झाल्याशिवाय समाजातील जाती व्यवस्था नष्ट होणार नाही, असे त्यांचे मत हाते. आपल्या अनुयायांना त्यांनी मिश्र विवाहाची अटच घातली. स्वत:च्या मुलाचाही त्यांनी मिश्र विवाह लावून दिला. महाराजांच्या मानवतावादी विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या विविध जाती धर्मातील शेकडो, हजारो लोकांनी कुटुंबासह आपली जात सोडली. मात्र या अनुयायी लोकांचा त्यांच्या गावात छळ सुरू झाल्याने त्यांनी गणपती महाराजांच्या आधाराने मंगरूळ दस्तगीर गावात आपले बस्तान हलविले. हे गाव अजात संप्रदायाचे मुख्य केंद्र  बनले. एकच जात मानवजात म्हणून या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. माळी, कुणबी, तेली अशा कितीतरी समाजातील लोकांचा यात सहभाग होता. समाजातील रूढी, परंपरांवर गणपती महाराजांनी ‘श्री पापलोप ग्रंथा’तून सडकून टीका केली. हरीचा बीजमंत्र, अभंगवाणी, सहज सिद्धानुभव, हरिगीता अशी बरीच साहित्यसंपदा लिहून त्यांनी समाजाला सुधारणावादी विचार दिले. 
स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी ‘श्वेत निशाणधारी अजात धर्मसंस्था’ निर्माण केली. स्त्रियांनी नवऱ्याच्या नावाने मंगळसूत्र घालणे, कपाळावर कुंकू लावणे, जोडवे घालणे हे स्त्री दास्याचे प्रतीक आहे, असे ते म्हणायचे. स्त्रियांची मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. स्त्रीला पाळीच आली नाही तर वंश वाढणार कसा? मग स्त्रीची पाळी विटाळ कशी होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी प्रतिगामी समाजावर चांगलेच आसूड ओढले. पाळीचे चार दिवस घरातील लक्ष्मीला घराबाहेर बसायला सांगणे हे भिकारचोटपणासोबतच हिंस्त्र आणि निर्दयीपणाचे कृत्य आहे, असे ते परखडपणे सांगायचे.
मृत्युनंतरच्या कर्मकांडांवरही त्यांनी टीका केली. श्राद्ध, पितृपक्ष यावरचा त्यांचा त्या काळातील शाब्दिक हल्ला त्यांच्यातील धाडसी विचारांची साक्ष पटविणारा आहे. ते म्हणतात, 
मृत वडील देहहीन, कैसे श्राद्धाचे भोजन ।
कराया येती स्वर्गातून, कैसे अन्न खाती ॥
मृत गाया दूध देईना, ऐसा ठरावच जाणा ।
तेसच वडील येईना, तळी भोजना वरून ॥ 
अजात संप्रदायातील स्त्री-पुरूष श्वेत वस्त्रेच परिधान करतात. कपाळावर पांढरे गंध लावून पांढरा ध्वज घेऊन फिरतात, कारण पांढरा रंग हा सर्व रंगांचे मूळ असण्यासोबतच शांतीचे प्रतीक आहे, असे गणपती महाराजांनी आपल्या अनुयायांना सांगितले. आजही या संप्रदायातील कुटुंब सर्वच प्रसंगात पांढरा रंग हमखास वापरतात. 
इ.स. १९२९ मध्ये मंगरूळ दस्तगीर येथे विठ्ठल मंदिर अस्पृश्य, दलितांसाठी खुले केल्यांनतर १९३१ मध्ये रत्नागिरीतील पतीत पावन मंदिर वि.दा. सावरकरांनी दलितांसाठी खुले केल्याची नोंद आहे. तर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरूजींनी १९४६ मध्ये उपोषण केले होते. सावरकर आणि साने गुरूजींच्याही पूर्वी गणपती महाराजांनी अस्पृश्य, दलितांसाठी सत्याग्रह केला, पंरतु इतिहासात त्यांची नोंद झाली नाही! गणपती महाराज सामाजिक समरसतेसाठी काम करीत आहे आणि त्यांनी गावातील विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले केले ही वार्ता त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गणपती महाराजांच्या कार्याची दखल घेतली. अमरावती येथे १९२५ मध्ये झालेल्या ‘अखिल भारतीय ब्राह्मणेत्तर बहिष्कृत परिषदे’चे अध्यक्षपद गणपती महाराजांना मिळाले. १९२९ मध्ये गणपती महाराजांच्या पुढाकाराने मंगरुळ दस्तगीर येथे वऱ्हाड मध्यप्रांत बहिष्कृत समाज परिषदेचे अधिवेशन झाले. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष विराटचंद्र मंडल (ज्यांच्या नावाने मंडल आयोग ओळखला जातो) हे होते. तर डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, पंढरीनाथ पाटील आदी सुधारणावादी नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. गणपती महाराजांनी अस्पृश्यता निवारण, स्त्री स्वातंत्र्य, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, आंतरजातीय विवाह, सामूहिक विवाह मेळावे, अन्न काला अशा विविध क्षेत्रात प्रबोधनाचे काम केले.
आज विदर्भातील शेती आणि शेतकरी विचित्र अवस्थेतून जात आहे. विदर्भात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवित आहेत. पण गणपती महाराजांनी त्यावेळी शेती आणि शेतकऱ्यांचे महत्व अधोरेखित केले. ते म्हणतात, 
शेतकऱ्याविन जास्त, कोणाचेच काम चालेना ।
सर्व शेतकरी-शेतकरी म्हणा, लागा भजना त्याच्याच ॥
शेत म्हणजे शरीर, जीव होय शेतकरी ।
तो नसल्या व्यवहार, कैसा होणार जगाचा ॥
अन्नदात्या शेतकऱ्याशिवाय जगराहाटी चालणार नाही, हे वास्तव गणपती महाराजांनी मांडले. पण आजही राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे महत्व कळू शकले नाही, ही शोकांतिकाच म्हटली पाहिजे.   
दि. १९ जून १९४४ रोजी गणपती महाराजांचे निधन झाले. दुदैर्वाने त्यांच्या निधनानंतर हा संप्रदाय बदेखल झाला. गणपती महाराजांची मुलं ज्ञानेश्वरदादा, सोपान महाराज यांच्यासह श्याम महाराज, चैतन्यप्रभू महाराज, पंढरीनाथ निमकर यांनी त्यांचे कार्य पुढे नेण्याचे प्रयत्न केले. कल्पनेत असलेली सामाजिक समरसता प्रत्यक्षात आणण्याचे काम गणपती महाराजांनी केले. परंतु जातीचे जोखड नाकारणाऱ्या अजात संप्रदायाचा मार्ग अनेक संकटांनी व्यापला आहे. ‘अजात’ शिक्का बसल्याने कोणत्याच जाती-धर्माचे लोक या संप्रदायाला आपले मानायला तयार नाहीत. आता अनेकांनी आपल्या मूळ जाती शोधून सरकारला माफीनामे लिहून देत जातीचे दाखले तयार केले. जातनिहाय जनगणना हवी की नको हा वाद टिपेला पोचला असताना जात न मानणारा हा संप्रदाय पुन्हा जातीच्या जोखडात अडकविला जावू लागला. या काळात प्रशासनाने ‘अजात’ ही जात असल्याचा जावाईशोध लावून या संप्रदायातील असंख्य विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर ‘अजात’ची ‘जात’ म्हणून नोंद केली! पण अजात ही नोंदणीकृत जात नसल्याने गणपती महाराजांच्या वंशजांसह अजात संप्रदायातील लोकांची शाळा प्रवेशापासून नोकरीपर्यंत सर्वत्र प्रचंड अडवणूक केली जात आहे. मंगरूळ दस्तगीर व लगतच्या गावांमध्ये अजात संप्रदाय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. रोज मजुरी व छोटे मोठे व्यवसाय करून या संप्रदायाची गुजराण सुरू आहे. गणपती महाराजांचे नातूही, पणतू अजुनही याच गावात आहेत. भाजीविक्रीच्या व्यवसायावर या कुटुंबाची रोजीरोटी सुरू आहे. गणपती महाराजांचे कार्य सुरूळीत सुरू राहावे म्हणून गावात श्वेतनिशाणधारी अजातीय मानवसंस्था ही ट्रस्ट स्थापन करण्यात आली. गावात गणपती महाराजांचे मोठे मंदिर असून तिथे जन्मोत्सव, पुण्यतिथीला विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. शासनाने जन्माचे दाखले, शाळेचे दाखले, सातबारा, कोतवाल बुकाची नक्क्ल आदी कागदपत्रांवर ‘अजात’ शिक्का मारला असली तरी, हा संप्रदाय मनातून जात मानत नाही. दैनंदिन व्यवहारांसाठी अजात प्रमाणपत्रांवर पुन्हा जातीचा शिक्का लागला तरी गणपती महाराजांनी दिलेला विचार हीच आमची जात आहे, असे हा संप्रदाय मानतो. 
—————————-
गणपती महाराजांची पणती सुनयना म्हणते, विचार तोच, दिशा नवी! 
गणपती महाराजांची पणती सुनयना सुद्धा शासनाच्या निर्णयाची बळी ठरली. सुनयनाने आता शासनाच्या या बेपर्वाईविरोधात आवाज उठविण्यासाठी लढा उभारला आहे. त्यासाठी जात न मानणाऱ्यांना पुन्हा गणपती महाराजांच्या विचारांनी एकत्र आणून तिने निर्जातिकरणाचे काम सुरू केले. त्यासाठी ती दररोज महाविद्यालयांमध्ये फिरून, व्याख्याने देऊन अजात संप्रदायाचा विचार तरूणाईसमोर मांडत आहे. त्यात तिला तरूणांची मोठी साथही लाभत आहे. सुनयनाचे वडील आणि गणपती महाराजांचे नातू श्याम महाराज यांनीही अजात संप्रदाय शासकीय स्तरावरून मिटविण्यात येत असल्याचा आरोप केला. मंगरूळ दस्तगीर येथे दिवाळीनंतर कार्तिक पोर्णिमेला मोठी यात्रा भरते. या यात्रेत सर्व अजात संप्रदाय एकत्र येतो. या यात्रेतूनच सुनयाने पुन्हा सर्वांना संघटित करून ‘विचार तोच, दिशा नवी’ म्हणत आपला लढा सुरू केला आहे. ती म्हणते, तुमच्या आडनावावरून तुमची जात कोणती याचा अंदाज आजही सुशिक्षित आणि अडाणी लोक घेतातच. त्यातूनच जाती-पातीचे राजकारण सुरू होते आणि समाज विखुरला जातो. जाती, धर्माचा अधार घेऊन दंगे भडकविले जातात. हे चित्र आजची विवेकवादी तरूणाईच बदलू शकते. त्यामुळे तरूणांच्या सहकार्याने गणपती महाराजांचे अजात कार्य पुढे नेण्याचा विश्वास तिने व्यक्त केला. शतकापूर्वी जो संदेश आपल्या कृतीतून माझे पणजोबा गणपती महाराजांनी दिला त्याचे अनुकरण करण्याची हीच योग्य वेळ आहे. याची सुरूवात मी स्वत:पासून केली आहे. मी माझ्या माहेरच्या, सासरच्या दोन्ही आडनावांची बिरूदावली काढून टाकली आहे. आता माझी ओळख केवळ ‘सुनयना अजात’ इतकीच आहे!  
गणपती महाराज म्हणतात, 
मानवाचा धर्म एकच मानव । 
सर्व भावे देव मिळविण्याचा ॥
ठेवा समान करून । 
धर्म बाबी सर्व जन ॥
या कार्याचा प्रसार आणि प्रचारासाठी सुनयनाने यवतमाळला ‘समर्पण’ नावाची संस्था स्थापन केली. जाती अंताच्या या लढाईत तरूणाईने समर्पित वृत्तीने सहभागी व्हावे, असे आवाहनही सुनयनाने केले आहे. 
(लेखक ‘मीडिया वॉच’ चे सहसंपादक आहेत)
९४०३४०२४०१
 
Previous articleआम्ही अजून जात पाळतो- अस्पृश्यताही…
Next article‘हे’ आणि ‘ते’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.